रत्नागिरी आणि बेळगावातील त्रिकुटाकडून निपाणीच्या हॉटेल व्यावसायिकाची ५१ लाखांची फसवणूक

Gramin Varta
202 Views

बेळगाव : बॉक्साईट मटेरियलच्या व्यवसायाचे आमिष दाखवून निपाणी येथील प्रसिद्ध ‘हॉटेल हरिप्रिया’चे मालक हर्ष आनंद शेट्टी यांची ५१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी आणि बेळगाव येथील तीन जणांविरोधात बेळगावच्या टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. संशयितांमध्ये रत्नागिरी येथील ‘जे. पी. शिपिंग अँड ट्रेडिंग कंपनी’चे मालक जितेश डी. यादव आणि प्रवीण यादव, तसेच बेळगावमधील अमृता गोविंद सूर्यवंशी यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी हर्ष शेट्टी यांचा विश्वास संपादन करून त्यांना बॉक्साईट मटेरियलच्या संयुक्त व्यवसायाचा प्रस्ताव दिला होता. व्यवसायातून मोठा आर्थिक लाभ मिळेल, असे आमिष दाखवत ३ ऑक्टोबर २०२३ ते ७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत टप्प्याटप्प्याने ५१ लाख रुपये उकळले. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतर संशयितांनी व्यवसाय सुरू करण्याबाबत कोणतीही हालचाल केली नाही. दरम्यानच्या काळात शेट्टी यांनी वेळोवेळी गुंतवलेली मूळ रक्कम आणि नफ्याबाबत विचारणा केली असता, त्यांना केवळ आश्वासने देऊन टाळाटाळ करण्यात आली. आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, शेट्टी यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिघांविरोधात फिर्याद नोंदवली.

या आर्थिक व्यवहाराचे करारपत्र बेळगाव येथे करण्यात आले होते. त्या आधारावर टिळकवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ४०६ (विश्वासघात) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सीपीआय परशराम पुजारी करत आहेत. निपाणीमधील एक प्रस्थापित आणि अनुभवी व्यावसायिक फसवणुकीचे बळी ठरल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक व्यवहारांच्या आमिषाला बळी न पडता सावध राहण्याचा इशारा या घटनेने दिला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *