प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय पाचल बाजारपेठेतच होणार; समितीकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Gramin Varta
283 Views

पाचल/ तुषार पाचलकर: राजापूर तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय पाचलच्या मध्यवर्ती बाजारपेठ परिसरातच होणार असून, या कार्यालयाच्या जागेबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांना पूर्णविराम देण्याचे आवाहन पाचल तालुका निर्मिती कृती समितीने केले आहे. कार्यालयाच्या स्थानाबाबत कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करू नये, असे स्पष्ट करत समितीने या जागेबाबतची सद्यस्थिती स्पष्ट केली आहे.

पाचल तालुका निर्मिती कृती समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, अप्पर तहसील कार्यालयासाठी बाजारपेठ परिसरात आवश्यक असलेली शासकीय जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे जागेची कोणतीही अडचण नाही. पाचलमध्ये महसूल, बँकिंग, कृषी, आरोग्य आणि शिक्षण यांसारखी महत्त्वाची कार्यालये आधीच एकाच परिसराच्या हाकेच्या अंतरावर कार्यरत आहेत. यामुळे नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी जाणेही सहज शक्य होणार आहे. पाचल बाजारपेठेत एसटी बसस्थानक, ई-सेवा केंद्रे, बँका, मेडिकल दुकाने आणि व्यापारी आस्थापने उपलब्ध असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.

प्रशासकीय सुसूत्रता आणि नागरिकांची सोय विचारात घेता, पाचल बाजारपेठ हीच अप्पर तहसील कार्यालयासाठी सर्वांत सक्षम आणि नैसर्गिक निवड ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. कार्यालयाचे कामकाज पाचल बाजारपेठ परिसरातच सुरू होईल, याची खात्री देत समितीने नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या चर्चांकडे दुर्लक्ष करून एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन केले आहे. कार्यालयाचे मुख्यालय निश्चित करताना उपलब्ध पायाभूत सुविधा आणि जनसुविधांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याने पाचलचा पर्यायच सर्वार्थाने योग्य असल्याचे समितीच्या वतीने पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले आहे.

Total Visitors :
4827490
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *