परदेशी टूरच्या नावाखाली रत्नागिरीतील महिलांची १२ लाख ४० हजारांची फसवणूक; दिल्लीतील संशयितावर गुन्हा दाखल

Gramin Varta
406 Views

रत्नागिरी (प्रतिनिधी): परदेश सहलीचे स्वप्न दाखवून ‘मेक माय टूरएक्स’ (Make My Tourx) या टुर कंपनीने रत्नागिरीतील दोन महिलांची तब्बल १२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुर्की-इस्तांबुल सहलीचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संदिप कुमार (रा. रोहिणी, दिल्ली) याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०२४ ते ११ जून २०२४ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी समृद्धी सुदेश मयेकर (वय ४५, रा. थिबा पॅलेस रोड) आणि त्यांच्या मैत्रिणीने ‘मेक माय टूरएक्स’ या कंपनीशी संपर्क साधला होता. आरोपी संदिप कुमार याने विविध कागदपत्रांचे आणि नियोजनाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादींकडून ५ लाख रुपये आणि त्यांच्या मैत्रिणीकडून वैभवी विजय खेडेकर यांच्या कुटुंबासाठी ७ लाख ४० हजार रुपये असे एकूण १२ लाख ४० हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले.

पैसे भरल्यानंतर आरोपीने ठरल्याप्रमाणे फिर्यादींना परदेशात नेले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही सहलीचे नियोजन केले नाही आणि भरलेली रक्कमही परत करण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच समृद्धी मयेकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडिया किंवा ऑनलाइन जाहिरातींना बळी पडून टुर पॅकेज घेताना नागरिकांनी संबंधित कंपनीची विश्वासार्हता तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4828037
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *