खेड : करजी-रहमत मोहल्ला येथे निकृष्ट कामामुळे दोन महिन्यांतच संरक्षण भिंत कोसळली

Gramin Varta
55 Views

खेड: खेड तालुक्यातील खारीपट्टा विभागातील करजी-रहमत मोहल्ला मार्गावर नुकतीच उभारलेली संरक्षण भिंत पावसाच्या पहिल्याच माऱ्यात कोसळल्याने प्रशासनाच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निष्कृष्ट कामामुळे रस्ता बंद होऊन वाहतूक ठप्प झाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. केवळ दोन महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेली ही भिंत कोसळल्याने विकासकामांसाठी वापरलेल्या निधीचा विनियोग कसा झाला, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून करण्यात आले होते. सिमेंट आणि वाळूचे प्रमाण योग्य नसल्यामुळे भिंतीचा पाया भक्कम राहिला नाही. विशेष म्हणजे, या मार्गावर गटारांचे कोणतेही योग्य नियोजन नसल्याने पावसाचे पाणी साचून भिंतीचे नुकसान झाले आहे. भर रस्त्यात भिंत कोसळल्याने रहमत मोहल्यातील रहदारी पूर्णपणे ठप्प झाली असून, वयोवृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणेही नागरिकांना कठीण झाले आहे.

या दुर्घटनेत संरक्षण भिंतीला लागून असलेला विद्युत खांबही कोसळला, मात्र नशिब बलवत्तर म्हणून तो शेजारील एका आंब्याच्या झाडाला अडकला. जर हा खांब शेजारील रहिवासी घरांवर पडला असता, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. एकीकडे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असताना दुसरीकडे प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता येथील जागरूक नागरिक करत आहेत.

Total Visitors :
4827781
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *