रत्नागिरी जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज; भात पुनर्लागवडीसह शेतीची कामे नियोजनबद्ध करण्याचा कृषी सल्ला

Gramin Varta
17 Views

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ११ ते १५ जुलैदरम्यानचा हवामान अंदाज व कृषी सल्ला प्रसिद्ध केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सियस दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नसल्याचे सल्लापत्रात नमूद करण्यात आले आहे.

कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पावसाची तीव्रता कमी असताना भात रोपांची पुनर्लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. पुनर्लागवड पूर्ण झालेल्या शेतांमध्ये २.५ ते ५ सेंटीमीटर पाण्याची पातळी राखून अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उशिरा पेरणी झालेल्या भात रोपवाटिकांना आवश्यकतेनुसार युरिया खताचा दुसरा हप्ता देण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

याशिवाय आंबा, काजू, नारळ, सुपारी, हळद तसेच विविध भाजीपाला पिकांसाठी खत व्यवस्थापन, नवीन लागवड आणि रोगप्रतिबंधक उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध करावीत तसेच अद्ययावत हवामान माहितीसाठी ‘मेघदूत’ आणि ‘दामिनी’ मोबाईल ॲपचा वापर करावा, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *