रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. कार्यालयीन कामकाजातील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी येथे कार्यरत असलेल्या दोन वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश आज, १० जुलै रोजी जारी करण्यात आले आहेत.
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, रत्नागिरी येथील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निशा कांबळे यांना कामकाजात अनियमितता आढळून आल्याने शासनाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय ‘जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी’ येथे निश्चित करण्यात आले आहे. यासोबतच, उपजिल्हाधिकारी (रेडे) हर्षलता गेडाम यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांच्या अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
एकाच दिवशी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने शासनाने ही पावले उचलली असल्याचे संकेत मिळत आहेत. विभागीय चौकशी ही अद्याप प्राथमिक प्रक्रिया असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच हर्षलता गेडाम यांच्यावरील पुढील दोषनिश्चितीबाबतचा निर्णय स्पष्ट होणार आहे. मात्र, निशा कांबळे यांच्यावरील निलंबनाची कारवाई तात्काळ प्रभावाने लागू झाल्याने प्रशासकीय स्तरावर ही एक मोठी घडामोड मानली जात आहे. या कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरीत महसूल विभागावर मोठी कारवाई; उपजिल्हाधिकारी निलंबित, तर एकावर विभागीय चौकशीचे आदेश
Leave a Comment
