रत्नागिरी: खानू केंद्रांतर्गत जि.प. प्राथमिक शाळा नाणीज क्र. १ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत कार्यानुभव उत्पादक उपक्रमांतर्गत भात रोप काढणी व लावणी,ट्रॅक्टरने नांगरणी यांचा प्रत्यक्ष आनंद घेतला.
भाताची रोपे अर्थात दाड काढणे ,ती लावताना सरस्वती रेवाळे या आजींनी कालबाह्य होत चाललेली भल्लरी गीते म्हणत लावणीमध्ये रंगत आणली. शेतकरी दत्ताराम रेवाळे यांनी विद्यार्थ्यांना शेतीविषयक माहिती दिली. दिनेश रेवाळे यांनी विद्यार्थ्यांना ट्रॅक्टर चालविण्याचा अनुभव प्रत्यक्ष कृतीतून दिला. यावेळी वेदिका रेवाळे,पा.शि. संघाच्या उपाध्यक्षा मुग्धा रेवाळे, प्रज्ञा सावंत उपस्थित होत्या. प्रत्यक्ष पावसात भिजत भात लावणी लावण्याचा अनुभव घेताना चिखलात मनसोक्त खेळण्याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी लुटला. महेश रेवाळे यांनी सर्व मुलांना खाऊ वाटप केले.
ग्रामीण भागातील शेतकरी ही हल्ली शेतीपासून दूर जाताना दिसत असताना मुलांना शेतीची ओळख व आवड निर्माण व्हावी यासाठी मुख्याध्यापक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपशिक्षक मनोजकुमार खानविलकर यांच्या नियोजनाखाली सलग दुसऱ्या वर्षी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.