GRAMIN SEARCH BANNER

दापोली तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस; दोन दिवसांत १३ जणांवर हल्ला

दापोली : तालुक्यातील पांनदी, कोळथरे, कोळबांद्रे, आघारी व वनौशी परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून गेल्या दोन दिवसांत तब्बल १३ ग्रामस्थांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दाभोळ पांक्रोशीसह दापोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे ग्रामस्थांसह लहान मुलेही असुरक्षित बनली आहेत. अचानक अंगावर धावून येत भटके श्वान चावा घेत असल्याच्या घटना घडत आहेत. तसेच मुख्य रस्त्यांवरून प्रवास करताना रस्त्यावर फिरणारे कुत्रे वाहनांच्या मागे धावत येत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत दाभोळ पांक्रोशीतील विविध गावांमध्ये १३ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. या हल्ल्यांमध्ये काही जणांच्या हातापायांना गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमींना प्रथम दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देण्यात आले असून काही रुग्णांना पुढील उपचारांसाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Total Visitor Counter

3483801
Share This Article