मुरगूड: ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने एका तरुणीला बोलावून घेऊन तिचे फोटो व अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत गेल्या आठ महिन्यांपासून तिच्यावर वारंवार सामूहिक अत्याचार केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून मुरगूड पोलीस ठाण्यात चौघा नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने चक्रावून या चारही संशयित तरुणांना शिताफीने अटक केली आहे. राधानगरी तालुक्याला काळीमा फासणाऱ्या या भयानक घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील रहिवासी असलेल्या पीडित तरुणीची मुख्य संशयित आरोपी आदित्य बाजीराव शेटके (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी) याच्याशी ओळख झाली होती. त्याने काही महिन्यांपूर्वी ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने तरुणीला मुदाळ तिट्टा येथे बोलावून घेतले आणि त्यानंतर तिला मुरगूड येथील तलाव परिसरातील झाडीमध्ये नेले. तिथे संशयिताने तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि बदनामीची भीती दाखवून तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला. यानंतर आदित्यने या तरुणीची ओळख रणजित संभाजी मुधोळकर (रा. सोळांकुर, ता. राधानगरी) याच्याशी करून दिली. संशयित रणजितने पीडितेला गिरगाव, कात्यायनी, सीबीएस कोल्हापूर तसेच पाचगाव परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या दरम्यान तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.
हा छळ इथेच थांबला नाही, तर या आरोपींनी तरुणीची ओळख प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (रा. राधानगरी) याच्याशी करून दिली. त्याने पीडितेला स्नॅपचॅटवर बोलण्यास भाग पाडले व स्वतःच्या कारमधून एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर विक्रम रामचंद्र पाटील (रा. बुजवडे, ता. राधानगरी) याच्याशीही तिची ओळख वाढवून देण्यात आली आणि त्यानेही पाचगाव येथील अशोकाराज लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. संशयितांनी वेळोवेळी पीडितेवर अत्याचार केले, तसेच हे गंभीर प्रकरण मिटवून देण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणीही केली. पीडितेने पैसे दिल्यानंतरही मोबाईलमधील फोटो व व्हिडिओ डिलीट केले जाणार नसल्याची धमकी देऊन तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.
गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेला हा भयानक त्रास असह्य झाल्यानंतर अखेर पीडितेने धाडस करून २ जून रोजी मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन जिल्हा पोलीसप्रमुख निलोत्पल यांनी तातडीने मुरगूड पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारही संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी प्रणवगिरी पालकर याचे कुटुंबीय शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित मानले जात असल्याने, त्यांच्या मुलाने केलेल्या या कृत्याबद्दल तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी संशयितांच्या बाजूने जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चाही रंगली होती. या संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास मुरगूड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत.






