GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत संशयास्पद रित्या फिरणारा युवक जेरबंद

दापोली : दापोली शहरात रात्रीच्या वेळी मालमत्तेविषयी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद रित्या फिरणाऱ्या एका युवकाला दापोली पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी २१ एप्रिल रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास दापोली एसटी स्टँडच्या बाजूला असलेल्या एका गल्लीमध्ये ही कारवाई करण्यात आली. अमित अनंत पाते (वय ३६, रा. आगरवायंगणी निगुडबोम्बवाडी, दापोली) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दापोली पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सुरेश मडके आणि त्यांचे सहकारी रात्रीच्या वेळी शहरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना दापोली एसटी स्टँडच्या शेजारी असलेल्या गल्लीमध्ये एक व्यक्ती टपरीच्या आडोशाला संशयास्पद हालचाली करताना दिसून आली. पोलिसांनी जवळ जाऊन पाहिले असता, संबंधित व्यक्ती स्वतःचे अस्तित्व लपवण्याचा प्रयत्न करत होती. रात्रीच्या वेळी सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या दरम्यान मालमत्तेविषयी कोणताही गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो त्या ठिकाणी दबा धरून बसला असावा, असा पोलिसांना संशय आला.

पोलिसांनी त्याला जाब विचारला असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दापोली पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमित पाते याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांकडून सातत्याने नजर ठेवली जात असून, या कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3485114
Share This Article