GRAMIN SEARCH BANNER

लोटे एमआयडीसी परिसरात  चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तरुणाला घेतले ताब्यात

Gramin Varta
123 Views

खेड: लोटे एम.आय.डी.सी. अंतर्गत तलारीवाडी ते गुणदे फाटा या संवेदनशील मार्गावर चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला खेड पोलिसांनी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. हा तरुण लोखंडी सळी घेऊन अंधारात दबा धरून बसला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालत असताना, तलारीवाडी ते गुणदे फाटा या रोडवर एक तरुण हातात लोखंडी सळी घेऊन संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळला. पोलिसांनी तात्काळ त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहताच या तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांचा ससेमिरा चुकवत त्याने एस.आय. ग्रुप कंपनीच्या गेटजवळून धूम ठोकली आणि अंधाराचा फायदा घेऊन लपून बसला. मात्र, कर्तव्यदक्ष पोलिसांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. पोलीस अंमलदार अशोक विठ्ठल मुंडे (पोकों/२६७) आणि त्यांच्यासोबतच्या पथकाने मोठ्या शिताफीने या तरुणाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव चंदन उरांव (वय १९ वर्षे) असून, तो सध्या लोटेमाळ, ता. खेड येथे राहत होता. त्याचे मूळ गाव पतराटोली, जि. रांची, झारखंड हे आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, तो उडवाउडवीची आणि असंबद्ध उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्याच्याजवळ एक लोखंडी सळी मिळून आली.

पोलिसांना खात्री झाली की, हा तरुण अंधाराचा फायदा घेऊन औद्योगिक वसाहतीच्या परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत होता.

त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, खेड पोलीस ठाण्यात गु.आर.नं. ३५१/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली असून, पोलीस या तरुणाचे इतर साथीदार आहेत का, याचा तपास करत आहेत. एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी होणाऱ्या संभाव्य चोऱ्या आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3072692
Share This Article