GRAMIN SEARCH BANNER

कडवई येथे रिक्षा संघटनेकडून महामानवाला विनम्र अभिवादन

Gramin Varta
138 Views

कडवई /मिलिंद चव्हाण: ६ डिसेंबर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील ‘रिक्षा मालक-चालक संघटना, कडवई-तुरळ-चिखली’ यांच्या वतीने आज महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या दिनाचे औचित्य साधून संघटनेच्या सदस्यांनी एकत्र येत बाबासाहेबांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

संघटनेच्या वतीने सर्वप्रथम कडवई बाजारपेठेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारे फलक लावून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर, सर्व पदाधिकारी व सदस्य कडवई येथील बौद्ध विहार येथे दाखल झाले. विहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि उपस्थित सदस्यांनी आदराने अभिवादन केले.

याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आणि त्यांनी समाजाला दिलेल्या योगदानाचा गौरव करत आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणातून महामानवाला मानवंदना दिली. अध्यक्ष चव्हाण म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी देशातील कोट्यवधी लोकांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला. त्यांच्या विचारांवर चालणे, हीच खरी आदरांजली आहे.

या अभिवादन कार्यक्रमासाठी संघटनेचे सहसचिव संदीप येलोंडे, तसेच सदस्य प्रमेश कदम, सचिन सुर्वे, मधुकर कुंभार, बंड्या मयेकर, यशवंत कुंभार, निलेश धामनाक, मनोज कांबळे आदी रिक्षा मालक-चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3366860
Share This Article