संतप्त महिलांनी रोखले प्रवेशद्वार
रत्नागिरी: विज वितरण कंपनी आणि एका खासगी ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून मिऱ्या भागात करण्यात आलेले भूमीगत केबल व स्ट्रीट लाईटचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत रत्नागिरीतील मिऱ्या येथील शेकडो नागरिकांनी आज महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीय होती. “आम्ही शॉक लागून मेल्यावर जागे होणार का?” असा संतप्त सवाल विचारत आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अधिकाऱ्यांनी बुधवारी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले.
महावितरण आणि खासगी कंपनीने लाखो रुपये खर्चून भूमीगत केबल टाकणे आणि स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम केले आहे. मात्र, हे काम करताना अंदाजपत्रकातील सुरक्षेचे सर्व नियम पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ‘हाय टेन्शन’ आणि ‘लो टेन्शन’ वाहिन्यांसाठी जमिनीखाली योग्य खोलीवर केबल टाकणे आवश्यक असताना, अतिशय वरवर केबल टाकण्यात आल्या आहेत.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, फिडर आणि डीपीच्या ठिकाणी मुख्य विद्युत वाहिन्या उघड्यावर पडल्या आहेत. केबलसाठी बसवण्यात आलेले लोखंडी बॉक्स अवघ्या काही दिवसांत सडून गेले असून ते उघडेच आहेत. यामुळे या परिसरात नागरिकांना व गुरांना वारंवार शॉक लागण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत मिऱ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महावितरणकडे वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु, अधिकारी आणि ठेकेदार कंपनीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अखेर नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला.
सोमवारी सकाळी मिऱ्या येथील ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने महिला घोषणाबाजी करत महावितरणच्या कार्यालयावर धडकल्या. कार्यालयात पोहोचताच संतप्त महिलांनी मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला आणि जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी स्वतः समोर येऊन चर्चा करत नाहीत, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा घेतला. सुरुवातीला महावितरणचे अधिकारी मोर्चेकऱ्यांचा सामना करण्यास टाळाटाळ करत दालनातच बसून राहिले, ज्यामुळे ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले आणि कार्यालयाबाहेर तणाव निर्माण झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वातावरण चिघळत असल्याचे पाहून अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महावितरणचे अधिकारी मोर्चेकऱ्यांसमोर आले. अधिकारी समोर येताच मिऱ्यावासीयांच्या संतापाचा उद्रेक झाला. “तुमच्या निकृष्ट कामामुळे लहान मुले आणि नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आम्हा कोणाचा तरी शॉक लागून जीव गेल्यावर तुम्ही जागे होणार का?” अशा शब्दांत महिलांनी अधिकाऱ्यांची लक्तरे काढली. नागरिकांच्या रोषापुढे अधिकाऱ्यांची बोलती पूर्णपणे बंद झाली होती.
मिऱ्यावासीयांचा हा आक्रमक आणि आक्रमक पवित्र पाहता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नमती भूमिका घेतली. अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारत, येत्या बुधवारी स्वतः मिऱ्या भागात येऊन ग्रामस्थांची भेट घेण्याचे मान्य केले. तसेच, खासगी कंपनीने केलेल्या निकृष्ट कामाची आणि उघड्या पडलेल्या केबल्सची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. अधिकाऱ्यांच्या या लेखी/तोंडी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले, मात्र बुधवारी योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मिऱ्यावासीयांनी दिला आहे.
