रत्नागिरी: जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून मत्स्य महाविद्यालय, शिरगाव आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यावसायिक विकासासाठी जीवन कौशल्ये’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालय परिसरातील सेमिनार हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संदीप करे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला मत्स्य महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. दबीर पठाण, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी आणि वरिष्ठ रोटेरियन दादा कदम उपस्थित होते. प्रमुख अतिथी डॉ. संदीप करे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक यशासाठी आवश्यक असलेल्या संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन, संघभावना, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, निर्णयक्षमता आणि भावनिक संतुलन या जीवन कौशल्यांचे महत्त्व विषद केले. केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून, बदलत्या स्पर्धात्मक युगात व्यक्तिमत्त्व विकास आणि सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धीवर भर देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच स्वतःच्या क्षमतांचा विकास करून समाजासाठी जबाबदार आणि सक्षम नागरिक बनण्याचे आवाहन त्यांनी केले.
या व्याख्यानाचा ८५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून, त्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी केले. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि रोजगारक्षमता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे आणि प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संदेश पाटील, डॉ. सुशील कांबळे आणि डॉ. राकेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
