रत्नागिरी: पावसाळ्यातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात वाहतुकीच्या समस्या आणि धान्य साठवणुकीत उद्भवणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांचे रेशन धान्य आता आगाऊ उचलून त्याचे वितरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना पावसाळ्यात धान्यासाठी रेशन दुकानांत वारंवार चकरा मारण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची कसरत करावी लागणार नाही.
शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, धान्य आगाऊ वितरित केले जाणार असले तरी, ई-पॉस मशिनवर प्रत्येक महिन्याचे व्यवहार आणि प्रमाणीकरण स्वतंत्रपणे करणे अनिवार्य आहे. शासकीय गोदामातून धान्य उचलण्यापूर्वी त्याची गुणवत्ता योग्य असल्याची खात्री कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. तसेच, किती धान्याची उचल झाली आणि रेशन दुकानांमधून प्रत्यक्षात किती वाटप झाले, याची माहिती दररोज सायंकाळी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
धान्य वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि तत्परता राखण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे. गोदामातून रेशन दुकानांपर्यंत धान्य पोहोचवणाऱ्या कंत्राटदाराने वाहतुकीत जाणीवपूर्वक विलंब केल्यास किंवा धान्याच्या वितरणात हलगर्जीपणा केल्यास, संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जाणार आहे. यामुळे पावसाळ्याच्या काळात ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थ्यांना धान्य टंचाईचा सामना करावा लागणार नाही, याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
