रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे दरवर्षीचे दु:स्वप्न यंदाही कायम राहिले आहे. १४ सप्टेंबर २०२६ रोजी असलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच, अवघ्या काही सेकंदात सर्व तिकिटे ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत. कोकणकन्या, मांडवी, तुतारी आणि वंदे भारतसारख्या प्रमुख गाड्यांचे बुकिंग काही क्षणांत संपल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बुकिंग सुरू होताच स्क्रीनवर ‘रिग्रेट’चा संदेश दिसू लागल्याने, पहाटेपासून संगणकासमोर बसलेल्या किंवा रेल्वे स्थानकांवरील खिडक्यांवर रांगा लावलेल्या हजारो चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. प्रवाशांच्या मते, रेल्वेचा ‘ओपनिंग कोटा’ अत्यंत मर्यादित असल्याने आणि दलालांनी बेकायदेशीर हाय-स्पीड सॉफ्टवेअरचा वापर करून तिकिटांवर डल्ला मारल्याने सामान्य प्रवाशांना तिकीट मिळणे अशक्य झाले आहे. रेल्वे गाडीतील एकूण क्षमतेपैकी खूप कमी जागा सामान्य जनतेसाठी खुल्या केल्या जातात, तर उर्वरित जागा विविध कोट्यांतर्गत राखीव ठेवल्या जातात, ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. दलालांकडून ब्लॉक केलेली हीच तिकिटे नंतर काळ्या बाजारात चढ्या दराने विकली जाण्याची भीती प्रवासी संघटनांनी व्यक्त केली असून, रेल्वे सुरक्षा बल आणि सायबर सेलने यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
रेल्वेचे तिकीट न मिळाल्यामुळे आता कोकणवासीयांना नाइलाजाने खासगी बसेसचा महागडा पर्याय निवडावा लागणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून भाडे दुप्पट-तिप्पट वाढवून चाकरमान्यांची लूट केली जाते. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीचा त्रास आधीच असताना, आता या आर्थिक भुर्दंडाने चाकरमान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, नियमित गाड्या फुल्ल झाल्या असल्या तरी, रेल्वे प्रशासन गणेशोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ३५० ते ४०० ‘गणपती विशेष’ फेऱ्या सोडण्याची शक्यता आहे. या विशेष गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या चाकरमान्यांच्या नजरा आता रेल्वेच्या अधिकृत घोषणेकडे लागल्या आहेत.
