रायगडमध्ये ६.९९६ किलो चरस जप्त

Gramin Varta
250 Views

रायगड: जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात श्रीवर्धन पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३५ लाख १८ हजार रुपयांचा चरस जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत ६.९९६ किलो चरस, मोटारसायकल आणि मोबाईल असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने १८ जुलै रोजी शेखाडी परिसरातील कोंडोवली स्मशानभूमीजवळ सापळा रचला. त्यावेळी मोटारसायकलवरून येणाऱ्या सादिक इब्राहिम शेखवडे (वय ६३, रा. शेखाडी) याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून २.१४६ किलो चरस जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे १० लाख ७३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक चौकशीत आरोपीने शेखाडी येथील बंद फायरवूड बोळीत आणखी चरस लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत ४.८५० किलो अतिरिक्त चरस जप्त केला. या साठ्याची किंमत २४ लाख २५ हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत एकूण ६.९९६ किलो चरस, एक मोटारसायकल व एक मोबाईल असा ३५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड करीत आहेत. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Total Visitors :
4566155
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *