आंबा, काजू नुकसानभरपाईसाठी रत्नागिरी जिल्ह्याला १८ कोटींचा निधी; शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात

Gramin Varta
299 Views
Money bag on the background of agricultural crops in the hand of the farmer. Agricultural startups. Profit from agribusiness. Lending and subsidizing farmers. Rupee, rupiah. Grants and support.

रत्नागिरी : गतवर्षी अवकाळी थंडी आणि बदललेल्या हवामानामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्यासाठी १८ कोटी ४४ लाख ६१ हजार रुपयांचा नुकसानभरपाई निधी मंजूर केला असून, या निधीचे वितरण सुरू झाले आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसानभरपाईची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जात असल्याने बागायतदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या हंगामात मार्च महिन्यातील उष्णतेनंतर नोव्हेंबरमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे आंबा पिकावर विपरीत परिणाम झाला. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळेही आंबा आणि काजू बागांचे मोठे नुकसान झाले. या हवामान बदलाचा परिणाम मोहोर, फळधारणा आणि उत्पादनावर झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते.

कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील अनेक भागांतील फळबागा बाधित झाल्या होत्या. शासनाने या अहवालाच्या आधारे नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. जिल्ह्यातील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात असून, मंजूर निधीतून नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांतील हजारो बागायतदार या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील एकूण ५२ हजार ६२८ शेतकरी आणि सुमारे ४३ हजार ६४६ हेक्टर क्षेत्र या नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले असून, यासाठी १८ कोटी ४४ लाख ६१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नुकसानभरपाईची रक्कम अपुरी असल्याची भावना काही बागायतदारांनी व्यक्त केली असली, तरी शासनाकडून निधीचे वितरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांना तात्पुरता आर्थिक आधार मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4572126
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *