जिल्ह्यातील कोणत्याही दिव्यांग बांधवावर अन्याय होऊ देणार नाही; जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांची ग्वाही

Gramin Varta
205 Views

नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी रत्नागिरीचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग संघटनेची बैठक संपन्न

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या, शासकीय योजनांचा लाभ, शिक्षण, रोजगार आणि आरोग्याबाबतच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या दालनात दिव्यांग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील कोणत्याही दिव्यांग बांधवावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही उपाध्यक्ष विलास चाळके यांनी दिली.

नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी, रत्नागिरीचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी आणि चिपळूण येथील दिव्यांग संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमध्ये दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी, प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, स्वयंरोजगार, सहाय्यभूत साहित्य आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देणे आपली सामूहिक जबाबदारी असून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे, असे उपाध्यक्ष विलास चाळके यांनी स्पष्ट केले. तसेच, दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी लवकरच जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या विशेष बैठकीस विविध विभागांचे अधिकारी आणि दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नवनिर्मिती फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे रमजान गोलंदाज यांनी सांगितले. बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने नियमित संवाद ठेवावा, विशेष शिबिरे आयोजित करावीत आणि स्वतंत्र समन्वय यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी केली. या बैठकीमुळे आगामी काळात दिव्यांगांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Total Visitors :
4580918
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *