चिपळूण : चिपळूण नगरपालिका क्षेत्रातील नगर बालसंरक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका अंजली कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चिपळूण नगरपालिकेच्या कौन्सिल बैठकीत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला. भाजपचे गटनेते शशिकांत मोदी यांनी अंजली कदम यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर नगरसेवक शुभम पिसे यांनी त्यास अनुमोदन दिले. या प्रस्तावाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार नगर परिषद क्षेत्रात नगर बालसंरक्षण समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालसंरक्षण यंत्रणा अधिक सक्षम करणे, बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सेवांमध्ये समन्वय निर्माण करणे तसेच बालकांवरील अत्याचार, शोषण, दुर्लक्ष, बालमजुरी, बालविवाह आणि बाल तस्करी यांसारख्या प्रकारांना प्रतिबंध घालणे हे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अध्यक्षांसह दहा सदस्यांची ही समिती पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यरत राहणार आहे.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर अंजली कदम यांनी सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. गेली वीस वर्षे त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून हेल्प फाउंडेशन, चिपळूणच्या उपाध्यक्षा म्हणून तसेच लायन्स क्लब, चिपळूणच्या माजी अध्यक्षा म्हणून त्यांनी महिला व बालकल्याणाच्या विविध उपक्रमांमध्ये योगदान दिले आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.





