सरकारी रुग्णालयांना आता 0 ते 5 स्टार रेटिंग; सेवेच्या गुणवत्तेनुसार होणार मानांकन

Gramin Varta
124 Views

मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील आरोग्यसेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘स्टार रेटिंग प्रणाली’ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील ग्रामीण रुग्णालयांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंतच्या सर्व रुग्णालयांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे 0 ते 5 स्टारपर्यंत सार्वजनिक गुणवत्ता मानांकन दिले जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी जारी केला.

नव्या प्रणालीअंतर्गत रुग्णालयांचे मूल्यांकन दहा महत्त्वाच्या निकषांवर करण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्यसेवेची उपलब्धता, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, आवश्यक औषधांचा साठा, निदान चाचण्या, बाह्यरुग्ण विभागाची सेवा, खाटांचा वापर, प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छता तसेच रुग्णांचा अभिप्राय या बाबींचा समावेश आहे. प्रत्येक निकषासाठी अर्धा स्टार देण्यात येईल. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या रुग्णालयाला पाच स्टार, तर कोणताही निकष पूर्ण न करणाऱ्या रुग्णालयाला शून्य स्टार मानांकन दिले जाईल.

रुग्णालयांच्या कामकाजाचे मूल्यांकन दरवर्षी जानेवारी आणि ऑगस्ट महिन्यात दोन वेळा प्रत्यक्ष तपासणी आणि उपलब्ध डेटाच्या आधारे केले जाईल. चार किंवा त्यापेक्षा अधिक स्टार मिळविणाऱ्या रुग्णालयांना विशेष गौरवपर प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या उपक्रमात ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा, सामान्य, स्त्री, संदर्भ सेवा, अतिविशेष उपचार तसेच राज्य कामगार विमा रुग्णालयांसह राज्यातील एकूण 623 सरकारी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये सेवेची गुणवत्ता वाढण्यास, स्पर्धात्मक वातावरण निर्माण होण्यास आणि नागरिकांना रुग्णालयांच्या कामगिरीची पारदर्शक माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे.

Total Visitors :
4827362
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *