GRAMIN SEARCH BANNER

स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील मालगुंड येथील आदर्श जीवन शिक्षण शाळा नं.१ शतकोत्तर अमृत महोत्सवाला ५ ऑगस्ट पासून प्रारंभ

Gramin Varta
14 Views

भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

संतोष पवार / जाकादेवी

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत स्थापित झालेल्या जीवन शिक्षण शाळा नं.१ या शाळेचा ५ ऑगस्ट रोजी शतकोत्तर अमृत महोत्सवला प्रारंभ  होत असून मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळेमध्ये शैक्षणिक, सामाजिक पर्यावरण विषयक कृती उपक्रमाबरोबरच   विद्यार्थ्यांच्या विविधांगी स्पर्धांचे आयोजन  शतकोत्तर अमृत महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत महाराष्ट्र राज्यात स्थापन  करण्यात आलेल्या  शाळांपैकी राज्यात २ ते ३ क्रमांकांची फार जुनी आणि ऐतिहासिक आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड या शाळेचा आवर्जून उल्लेख केला जातो. सदरचा शतकोत्तर अमृत्सव महोत्सवाचा उद्घाटन समारंभ उद्योग मंत्री तथा रत्नागिरी  रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते करण्याचे शतकोत्तर अमृत महोत्सवी समिती व शाळा व्यवस्थापन समितीने आयोजले आहे.

विशेष म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिश राजवटीत १८५१ साली  मालगुंड येथे जीवन शिक्षण शाळा नंबर १ ची स्थापना झाली. ही  शाळा ५ ऑगस्ट २०२५ मध्ये १७५ वर्षात पदार्पण करत आहे. ऑगस्ट २०२५ ते ऑगस्ट २०२६ हे वर्ष शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष म्हणून अतिशय दिमाखात साजरे केले जाणार आहे. या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त शतकोत्तर अमृत महोत्सव समिती,शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे माजी विद्यार्थी,आजी- माजी पालक , शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांच्या संयोगातून हा दिमाखदार महोत्सव साजरा केला जाणार आहे .यासाठी प्रारंभीच्या काळात या शाळेतून शिक्षण घेऊन स्वावलंबी झालेले शाळेची माजी विद्यार्थी ,आज अनेक मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत, तर काही देश- परदेशातही आपापले उद्योगधंदे- व्यवसाय, नोकरी सांभाळत आहेत.काही शैक्षणिक- सामाजिक -धार्मिक क्षेत्रात नावलौकिकास पात्र ठरले आहेत. पैकी काही माजी विद्यार्थी शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत. या शाळेतील  माजी विद्यार्थी शिक्षण व नोकरी निमित्त मुंबई पुणे नाशिक तसेच राज्याच्या विविध भागातही स्थायिक झालेले आहेत.

या शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त अमृत महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परिसरातील १९६० सालच्या दरम्यानचे  तसेच अलिकडच्या काळातील अनेक माजी विद्यार्थी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी  बहूसंख्य व मोठ्या उत्साहाने एकत्रित आले आहेत. या महोत्सवाचे औचित्य साधून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण संदर्भात भरीव स्वरूपाचे उपक्रम राबवण्यावर ही शाळा भर देणार आहे. यामध्ये वृक्ष लागवड, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,स्तोत्र पाठांतर, संविधान पाठांतर, कथाकथन चित्रकला, रांगोळी स्पर्धा ,समूहगीत गायन ,देशभक्तीपर गीत गायन ,क्रीडा स्पर्धा अशा विविध  स्पर्धांचे नियोजन माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. या महोत्सवाचे औचित साधून शासकीय स्तरावरून मोठ्या स्वरूपाचा निधी उपलब्ध करण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे.

शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत शाळेचे तत्कालीन माजी विद्यार्थी सुनिल मयेकर, गिरीश बापट,गजानन पाटील, विलास राणे, श्रीकांत मेहेंदळे , डॉ.संतोष केळकर यांसह विविध वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी  यामध्ये लोकसत्ता दैनिकाचे विनोद कदम, दैनिक तरूण भारतचे संतोष पवार, दैनिक पुढारीचे अमित जाधव, दैनिक सागरचे संदीप खानविलकर आदी उपस्थित होते. शाळेच्या जागेत एक मल्टीपर्पज बहुउपयोगी असा सभागृह उभारण्याचा संकल्प आहे. एवढेच नव्हे तर माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा ,गेट-टुगेदर तसेच विविध संस्कृती जपणारे  सामाजिक उपक्रम शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त निश्चित करण्यात आले आहेत. नियोजित सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या  माजी विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. जिल्हा, परजिल्ह्यात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शतकोत्तर अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकांत मेहेंदळे (९४०३५०७९०५ ),शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरीश बापट, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रिया शिर्के ( ९४०३९३६३४६ ) यांच्याकडे माजी विद्यार्थ्यांनी संपर्क साधून या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सर्व उपक्रमांत सहभागी  होण्याचे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका व शाळेचे माजी विद्यार्थी यांनी केले आहे.

Total Visitor Counter

2652219
Share This Article