रत्नागिरी / अजय सावंत : रत्नागिरी शहरात ब्रॉडबँड आणि केबल नेटवर्कच्या सुविधांचा विस्तार होत असताना त्यासाठी टाकण्यात आलेल्या केबल्स आता नागरिकांच्या सुरक्षिततेलाच धोका निर्माण करत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये उभारलेल्या विद्युत खांबांवर केबल्स निष्काळजीपणे गुंडाळून तसेच लोंबकळत्या अवस्थेत सोडण्यात आल्याचे चित्र दिसत असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.
नाचणे ते शहर या मुख्य मार्गासह अभुदय नगर, पॉवर हाऊस आणि शहरातील विविध भागांमध्ये अनेक विद्युत खांबांवर काळ्या रंगाच्या केबल्स मोठ्या प्रमाणात लोंबकळताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी या केबल्स खांबांना व्यवस्थित बांधलेल्या नसून त्या थेट रस्त्याच्या दिशेने झुकलेल्या आहेत. काही ठिकाणी एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीपर्यंत केबल्सचे जाळे पसरविण्यात आले असून त्या कधीही खाली कोसळू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
केबल टाकण्याचे काम करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले नसल्याचे या परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे. सुविधा पुरविण्याच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. विशेषतः रस्त्याच्या दिशेने झुकलेल्या केबल्समध्ये दुचाकी, चारचाकी किंवा मालवाहू वाहनांचा एखादा भाग अडकून गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढतो. मुसळधार पाऊस, जोरदार वारा किंवा कमी दृश्यमानतेमुळे लोंबकळणाऱ्या केबल्स वेळेवर दिसून येत नाहीत. अशा वेळी वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते. एखादी केबल तुटून रस्त्यावर पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुर्घटना घडल्यानंतर हालचाल करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी आताच उपाययोजना करण्याची गरज आहे. नगर परिषद प्रशासनाने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची तातडीने पाहणी करून धोकादायक अवस्थेतील केबल्स हटवाव्यात, संबंधित केबल ऑपरेटर आणि कंत्राटदारांना जबाबदार धरून आवश्यक कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून केली जात आहे.
सुविधेच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ? रत्नागिरीत लोंबकळणाऱ्या केबल्समुळे अपघाताचा धोका वाढला
Leave a Comment





