देवरुख: प्रबोधन शिक्षण संस्थेचा कृषी विद्यापीठासोबत करार

Gramin Varta
56 Views

देवरुख: दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला.

विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये उद्योजकता, संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा करार एक महत्त्वाचा ठरणार आहे.

कराराचा मुख्य उद्देश विद्यापीठ आणि संस्था परिसरामध्ये उद्योजकता, नावीन्यपूर्ण उपक्रम, संशोधनाचे व्यापारीकरण आणि स्टार्टअप इन्क्युबेशनला प्रोत्साहन देण्यासाठी एक संयुक्त व्यासपीठ निर्माण करणे हा आहे. या कराराअंतर्गत प्रामुख्याने सल्लागार सेवा, संयुक्त प्रकल्प, संयुक्त संशोधन, प्राध्यापक आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रम, इन्क्युबेशन अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये दोन्ही संस्था मिळून काम करणार आहेत.

या भागीदारीतून संस्थेच्या सर्व महाविद्यालयांना एक सुसज्ज स्टार्टअप इकोसिस्टीम उभारण्यासाठी इन्क्युबेटरला भक्कम पाठबळ दिले जाईल. या माध्यमातून विद्यार्थी, प्राध्यापक आणि बाहेरील नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन, इन्क्युबेशन आणि सर्वतोपरी उद्योजकीय मदत पुरवली जाणार आहे.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पी. यू. शहारे, शिक्षण संचालक डॉ. सतीश एस. नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, कुलसचिव उमेश चंडिवडे, जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एस. व्ही. सावर्डेकर, प्रक्षेत्र संचालक डॉ. अरुण माने, विद्यापीठाचे अभियंता राहुलजी घाडगे, कृषी रसायन आणि मृदा विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. मनीष कस्तुरे, संशोधन उपसंचालक डॉ. वैभव राजेमहाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रद्युम्न आर. माने, NRIF च्या संचालिका सौ. ईशानी वाघ, राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत आणि इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल बी. खाडे उपस्थित होते.

या करारामुळे तंत्रज्ञान, कृषी आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना स्वतःचे उद्योग आणि स्टार्टअप्स उभे करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळणार असून, कोकणातील संशोधन आणि औद्योगिक विकासाला यामुळे नवी दिशा मिळेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष व माजी पालकमंत्री रवींद्र माने यांनी व्यक्त केला आहे.

Total Visitors :
4602591
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *