महाराष्ट्रातील ३१९५ रुग्णवाहिकांना मिळणार ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’; आता सर्व रुग्णांसाठी उपलब्ध होणार सेवा

Gramin Varta
99 Views

मुंबई : राज्यातील आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही, पारदर्शक आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने १०२ रुग्णवाहिकांसाठी ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन खरेदी व्यवस्थापनात सुलभता येण्यासोबतच आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक होऊन कामकाजातील अनावश्यक विलंब कमी होण्यास मदत होणार आहे.

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, आरोग्य सेवा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनदायी व्यवस्था आहे. या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विश्वासार्ह आणि पारदर्शक व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’सारख्या अभिनव उपक्रमामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता येईल आणि संपूर्ण यंत्रणा अधिक उत्तरदायी बनेल.

यापूर्वी १०२ रुग्णवाहिकांची सेवा माता व बालकांसाठी वापरात होती. आता १०२ रुग्णवाहिका सर्व रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, ही सेवा अधिक प्रभावी आणि सक्षम करून १०८ रुग्णवाहिकेला पर्यायी व्यवस्था तयार करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिल्या.

राज्यातील शासकीय वाहनांना वेळेत इंधन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एचपीसीएलच्या सहकार्याने राज्यातील तब्बल ३१९५ रुग्णवाहिकांना ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ देण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी मॉनिटरिंगच्या माध्यमातून नागरिकांना अधिक जलद आणि दर्जेदार आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

कोरोनासारख्या संकटाच्या काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेचा उल्लेख करताना आबिटकर यांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही नागरिकांसाठी मोठा आधार असल्याचे सांगितले. नागरिकांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सेवाभावाने आणि जबाबदारीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत, प्रकल्प संचालक (ईएमएस) रवींद्र सावंत, उपसंचालक जयंत मुळे तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संचालक विजय कंदेवाड आणि राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व हिंदुस्थान पेट्रो केमिकल लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य आयुक्त, आयटी विभाग तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी विशेष अभिनंदन केले. भविष्यातही तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Total Visitors :
4610035
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *