रत्नागिरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: हरवलेले १०३ मोबाईल मूळ मालकांना परत

Gramin Varta
121 Views

रत्नागिरी:नागरिकांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल तांत्रिक तपासाच्या माध्यमातून शोधून काढण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठे यश आले असून, तब्बल १०३ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना यांच्या हस्ते २९ जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात हे मोबाईल नागरिकांना परत देण्यात आले.

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी आणि सायबर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. गहाळ झालेल्या मोबाईलच्या प्राप्त तक्रारींचे संकलन करून, अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाचा आणि ‘सीईआयआर’ (CEIR) प्रणालीचा प्रभावी वापर करत पोलिसांनी या सर्व मोबाईलचा शोध घेतला. आपले हरवलेले मौल्यवान मोबाईल पुन्हा मिळाल्यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत रत्नागिरी पोलीस दलाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना यांनी सर्व नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी तत्काळ ‘सीईआयआर’ (Central Equipment Identity Register) प्रणालीवर त्याची नोंद करून जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे ते म्हणाले. तसेच, कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यास विलंब न लावता तात्काळ रत्नागिरी पोलीस दलाशी संपर्क साधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

रत्नागिरी पोलीस दल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांची हरवलेली मालमत्ता शोधून देणे आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. यापुढेही नागरिकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, अंमलदार आणि मोबाईल परत मिळालेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -
Total Visitors :
4610033
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *