रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पाऊस, सागरी किनारपट्टीवरील प्रतिकूल हवामान तसेच विविध पोलीस बंदोबस्ताच्या ठिकाणी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने दिनांक २९ जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पावसाळी रेनकोट वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या आयोजित कार्यक्रमामध्ये कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना यांच्या शुभहस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील होमगार्ड जवानांना पावसाळी रेनकोटचे वितरण करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील होमगार्ड जवान हे सागरी सुरक्षा, किनारपट्टीवरील गस्त, नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदत व बचावकार्य, विविध पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियमन तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या कार्यात पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून सातत्याने सेवा बजावत असतात. विशेषतः पावसाळ्यात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत कर्तव्य पार पाडत असतात. अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षित, कार्यक्षम व अधिक सक्षमपणे कर्तव्य बजावता यावे, या उद्देशाने रेनकोटचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना यांनी होमगार्ड जवानांच्या सेवेचे कौतुक केले. यावेळी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी, होमगार्ड अधिकारी तसेच मोठ्या संख्येने होमगार्ड जवान उपस्थित होते.





