खेड : भारतीय जनता पक्षाने खेड शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. वैजेश सागवेकर यांची भाजप खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुखपदी, तर राहुल पाटणे यांची भाजप खेड शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे शहरातील पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असून आगामी स्थानिक तसेच राजकीय उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नियुक्तीनंतर वैजेश सागवेकर आणि राहुल पाटणे यांचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खेड शहरातील प्रत्येक शक्तीकेंद्र आणि बूथ स्तरावर संघटन अधिक प्रभावी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. पक्षाची विचारधारा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर देण्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, प्रदीप भोसले, प्रशांत मुद्राळे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेड शहरातील प्रत्येक प्रभागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवणे तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे ही आगामी काळातील प्रमुख जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. वैजेश सागवेकर आणि राहुल पाटणे यांच्या नियुक्तीमुळे शहरातील पक्ष संघटनेला नव्या जोमाने काम करण्यास चालना मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, नियुक्तीबद्दल वैजेश सागवेकर आणि राहुल पाटणे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. पक्षाने सोपविलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडून संघटना अधिक सक्षम करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
खेड शहरातील भाजप संघटनबांधणीला बळ; वैजेश सागवेकर शक्तीकेंद्र प्रमुख, राहुल पाटणे शहर उपाध्यक्षपदी
Leave a Comment






