रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील घटती पटसंख्या प्रशासनासमोर चिंतेचा विषय ठरली असून, विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी असलेल्या पाच शाळा बंद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांचे जवळच्या इतर पालिका शाळांमध्ये समायोजन करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असून अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या एकूण २२ प्राथमिक शाळांपैकी यापूर्वीच चार शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सध्या कार्यरत असलेल्या १८ शाळांपैकी सात शाळांमध्ये ५० हून अधिक विद्यार्थी आहेत, तर पाच शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षाही कमी असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या शाळा सुरू ठेवणे आर्थिक आणि प्रशासकीयदृष्ट्या अवघड ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने संबंधित शाळांतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याचा पर्याय पुढे केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, तसेच शिक्षक आणि उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा अधिक प्रभावी वापर करता येईल, असा प्रशासनाचा दावा आहे.
दरम्यान, पालिकेच्या अनेक शाळांच्या इमारतीही दुरुस्तीअभावी जीर्ण झाल्या आहेत. सर्व इमारतींवर खर्च करण्याऐवजी निवडक शाळांमध्ये दर्जेदार शैक्षणिक सुविधा, डिजिटल शिक्षण, आवश्यक साहित्य आणि सुरक्षित इमारती उपलब्ध करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मात्र, शाळा बंद करण्याच्या प्रस्तावामुळे संबंधित भागातील पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना अधिक अंतराचा प्रवास करावा लागू नये, तसेच त्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होऊ नये, याची काळजी घेऊनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसून सर्व बाबींचा अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
रत्नागिरी पालिकेच्या 20 पटसंख्या असलेल्या पाच शाळा होणार बंद?
Leave a Comment





