राजापूर : महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या आदिशक्ती अभियानात उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत गोठणे-दोनिवडे ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. महिला सक्षमीकरण, आरोग्य संवर्धन, सामाजिक प्रबोधन आणि विविध लोकाभिमुख उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल ग्रामपंचायतीला हा बहुमान मिळाला असून परिसरातून तिचे कौतुक होत आहे.
आदिशक्ती अभियानाच्या माध्यमातून गावात महिला व मुलींच्या विकासाला प्राधान्य देत विविध उपक्रम राबविण्यात आले. हुंडाबळी निर्मूलन, व्यसनमुक्ती जनजागृती, सामूहिक विवाह, मुलगी जन्माचे स्वागत, बालविवाह प्रतिबंध, शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन, कौशल्य विकास प्रशिक्षण, महिलांची आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी तसेच पोषण आणि आरोग्याविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली. या सर्व उपक्रमांना गावातील महिला, युवती आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महिलांच्या आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक सहभागाला चालना देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली. शासनाच्या उद्दिष्टांची यशस्वी पूर्तता करत ग्रामपंचायतीने सामाजिक परिवर्तनाचा आदर्श निर्माण केला असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे.
या यशामध्ये सरपंच मुकेश विचारे, उपसरपंच सुप्रिया हातणकर, ग्रामसेविका वडर मॅडम, आदिशक्ती समितीच्या अध्यक्षा श्रेया प्रकाश शिंदे, सचिव सायली नवनाथ भोसले, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शाळा व हायस्कूलचे मुख्याध्यापक, आरोग्य विभागाची टीम, सीआरपी बचत गटाच्या अध्यक्षा तसेच गावातील सर्व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले.लोकप्रतिनिधी व गावातील सामाजिक कार्यकर्ते व पंचायत समिती राजापूर, पोलीस स्टेशन राजापूर यांचे बहुमूल्य सहकार्य लागले.
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून गोठणे-दोनिवडे ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महिला सन्मान, आरोग्यदायी समाज निर्मिती आणि सामाजिक परिवर्तनासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या कार्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून या यशामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
राजापूर: आदिशक्ती अभियानात गोठणे-दोनिवडे ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी; प्रथम क्रमांकाचा मान
Leave a Comment




