ज्याच्यासोबत संसार केला, त्यालाच जिवंतपणी ‘समाधी’ देण्याचा प्रयत्न; गुंगीचे औषध देऊन बॅटने मारहाण, घटनेने काळीज हेलावले

Gramin Varta
175 Views

बारामती : ‘दृश्यम’ चित्रपटातील कथानकाची आठवण करून देणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना बारामती शहरात समोर आली आहे. पत्नीनेच पतीला गुंगीचे औषध देऊन अर्धवट बेशुद्ध केल्यानंतर बॅटने मारहाण केली आणि त्यानंतर घराच्या गॅलरीत विटा-सिमेंटचा कट्टा बांधून त्याला त्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. सुदैवाने हा प्रकार वेळीच उघडकीस आल्याने पतीचा जीव वाचला. या घटनेने बारामती शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक ९ येथे ३० जुलै २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ते १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शर्मिला प्रवीण जगताप (वय ३८) हिने पती प्रवीण प्रकाश जगताप यांना ठार मारण्याच्या उद्देशाने गुंगीचे औषध दिल्याचा आरोप आहे. औषधाच्या प्रभावामुळे प्रवीण अर्धवट बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना बॅटने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर प्रवीण यांना कायमचे संपवून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरातील हॉललगतच्या गॅलरीमध्ये विटा आणि सिमेंटचा चौकोनी कट्टा बांधण्यात आला. अर्धवट बेशुद्ध अवस्थेतील प्रवीण यांना या कट्ट्यात झोपवून त्यावर कडप्पा फरशी लावून तो पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार वेळेत लक्षात आल्याने प्रवीण यांचा जीव वाचला.

या प्रकरणी प्रवीण जगताप यांचे वडील प्रकाश जगताप यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून शर्मिला जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला घरातच जिवंत पुरण्याचा कथित प्रयत्न झाल्याने या घटनेने परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत असून, घटनेमागील नेमके कारण, कथित कटाचा उद्देश आणि या प्रकरणातील इतर बाबी तपासानंतर स्पष्ट होणार आहेत. पोलिसांच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4662127
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *