चिपळूण तालुक्यात घटत्या पटसंख्येमुळे ६ जिल्हा परिषद शाळा बंद; इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शाळांसमोर अस्तित्वाचा प्रश्न

Gramin Varta
89 Views

चिपळूण : तालुक्यात ग्रामीण भागातील पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडे वाढता कल आणि स्थलांतरामुळे जिल्हा परिषद शाळांसमोर गंभीर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षात पहिलीच्या पटसंख्येत मोठी घट झाल्यामुळे प्रशासनाला तालुक्यातील तब्बल ६ जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला असून, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळील इतर शाळांमध्ये समायोजन केले जात आहे. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील शैक्षणिक वर्षात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ७ हजार ३६६ विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि पहिलीत ९८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, मात्र चालू शैक्षणिक वर्षात पहिलीतील प्रवेशसंख्या ८६७ वर आल्यामुळे तब्बल १२० विद्यार्थ्यांची घट झाली आहे.

या घटत्या पटसंख्येमुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या अत्यल्प झाल्याने मुंढे खोत, रावळगाव क्रमांक २, ढाकमोळी चिंच, कोलकेवाडी-जांब्रारी, कुटरे खेर आणि कुटरे बौद्धवाडी येथील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची कठोर कारवाई प्रशासनाला करावी लागली आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांचे जवळील इतर शाळांमध्ये समायोजन केले जात असले तरी, शाळा टिकवण्यासाठी गुरुजींकडून वाडी-वस्त्यांवर जाऊन पालकांशी संवाद साधणे, मराठी शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, पोषण आहार, डिजिटल शिक्षण आणि विविध उपक्रमांची माहिती देण्याचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. असेही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त होत असून, ग्रामीण भागातील पालकांचा खासगी शाळांकडे वाढता ओढा थांबवणे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.

दरम्यान, चिपळूण शहरातील खेंड येथील जिल्हा परिषद शाळेने मात्र या बिकट परिस्थितीतही आशेचा किरण दाखवला असून ती इतर शाळांसाठी एक आदर्श ठरली आहे. एकेकाळी बंद पडलेली ही शाळा शिक्षक ज्ञानेश्वर मोरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पालकांशी सतत संवाद साधून त्यांचा विश्वास पुन्हा संपादन केल्यामुळे नव्या जोमाने सुरू झाली असून तिथे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढू लागली आहे. योग्य नियोजन, पालकांशी संवाद आणि शिक्षकांची जिद्द असेल तर मराठी शाळाही पुन्हा बहरून येऊ शकतात, हे या उदाहरणातून सिद्ध झाले आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4662220
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *