राजापूर : सामाईक जमीन आणि बागेच्या हक्कावरून सुरू असलेल्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची घटना राजापूर तालुक्यातील डोंगर तिठा येथे ७ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या प्रकरणात भावजय आणि दीर यांनी एकमेकांविरोधात मारहाण व दुखापत केल्याच्या तक्रारी दाखल केल्या असून, दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहासिनी सुरेश तावडे (वय ६०, रा. विलये मिराशीवाडी, ता. राजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या पती सुरेश तावडे यांच्यासोबत ग्रामीण रुग्णालयातून घरी परतल्यानंतर सामाईक जमिनीतील बागेत नामदेव धोंडू तावडे हे साफसफाई करत असल्याचे दिसले. यावेळी त्यांनी नामदेव यांना जमिनीबाबत सांगितल्यानंतर वाद झाला. नामदेव यांनी शिवीगाळ करून हातातील पिशवीतून कोयती काढून त्यांच्या अंगावर धावून आल्याचा आरोप आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या खाली वाकल्या असता कोयतीचा वार त्यांच्या पाठीवर व उजव्या खांद्यावर लागून दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नामदेव धोंडू तावडे (वय ६१, रा. विलये मिराशीवाडी) यांनीही सुरेश धोंडू तावडे (वय ७२) आणि सुहासिनी सुरेश तावडे यांच्याविरोधात स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. नामदेव यांच्या तक्रारीनुसार, ते सामाईक जागेतील बागेत साफसफाई करून परतत असताना सुरेश व सुहासिनी यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी त्यांच्या हातातील पिशवी ओढून त्यातील दोन कोयत्या काढून घेतल्याचा आरोप आहे. सुरेश यांनी त्यांना पकडले, तर सुहासिनी यांनी कोयतीने त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीवर वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच, खाली पडल्यानंतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून छाती व पाठीवर दुखापत केली आणि सुरेश यांनी डोक्याच्या डाव्या बाजूला कोयतीने मारल्याचा आरोप नामदेव यांनी केला आहे. याशिवाय बागेत पुन्हा आल्यास पाय तोडण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २००/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
सामाईक जमीन व बागेच्या वादातून घडलेल्या या घटनेत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी आरोप करण्यात आले असून, राजापूर पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
राजापुरात सामाईक जमिनीच्या वादातून भावजय-दीर आमनेसामने; कोयतीने मारहाणीच्या परस्पर तक्रारी
Leave a Comment






