चिपळूण: दहिवली खुर्दमध्ये माजी सभापती पूजा निकम यांच्याहस्ते वृक्षारोपण आणि विकासकामांचा आढावा; ग्रामस्थांशी साधला थेट संवाद

Gramin Varta
64 Views

चिपळूण : तालुक्यातील दहिवली खुर्द ग्रामपंचायतीला पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा शेखर निकम यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी पंचायत समिती बांधकाम विभागाच्या सहकार्यातून ग्रामपंचायत परिसरात सौ. पूजा निकम यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखत गावाच्या सौंदर्यीकरणात भर घालण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या वृक्षारोपणानंतर त्यांनी ग्रामपंचायत परिसराची पाहणी करत गावात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.

भेटीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत गावातील विकासकामांवर आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर सखोल चर्चा झाली. बैठकीत प्रामुख्याने पंधरावा व सोळावा वित्त आयोग आराखडा निश्चित करणे, गावातील प्रलंबित रस्ते व इतर बांधकामे, प्राथमिक आरोग्य सुविधा, शेतीविषयक कृषी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि महिला व बालकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. याशिवाय गावात सुरू असलेल्या विकासकामांच्या अनुषंगाने ग्रामस्थ आणि शासकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली.

यावेळी बोलताना सौ. पूजा निकम यांनी शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा अत्यंत योग्य व पारदर्शक वापर करून गावातील मूलभूत समस्या प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याचे कडक निर्देश दिले. सर्व विकासकामे करताना स्थानिक सरपंच आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ग्रामसेवकांनी निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीदरम्यान त्यांनी गावातील महिला व नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. लोकप्रतिनिधींनी स्वतः गावात उपस्थित राहून प्रशासकीय त्रुटी आणि जनतेच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्याबद्दल दहिवली खुर्दच्या नागरिकांनी सौ. पूजाताई निकम यांचे विशेष आभार मानले. या आढावा बैठकीला दहिवली खुर्दच्या सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील श्री. ज्ञानेश्वर घाग, अमोल पिरधनकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. कदम, अंगणवाडी सेविका, गावातील प्रमुख महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -
Total Visitors :
4669147
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *