मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंमलबजावणी सुरू असून, जुलैअखेर विमा नोंदणीला कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे राज्य सरकारने १० दिवसांची वाढीव मुदत दिली होती. या मुदतवाढीनंतर शेतकऱ्यांच्या प्रतिसादात वाढ झाली असून १० ऑगस्टपर्यंत राज्यभरातून एकूण ८१ लाख ४० हजार ९१३ शेतकऱ्यांनी पीकविमा पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे. यामध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ७७ लाख १६ हजार २४६ असून कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ४ लाख २४ हजार ६६७ इतकी आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या नोंदणीची मुदत संपली असली, तरी कर्जदार शेतकऱ्यांची माहिती भरण्यासाठी आणि विमा हप्ता अदा करण्यासाठी बँकांना ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
गतवर्षी पीकविमा योजनेचा अपेक्षेप्रमाणे लाभ न मिळाल्यामुळे आणि यंदा लागू करण्यात आलेल्या काटेकोर निकषांमुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीला या योजनेकडे पाठ फिरवली होती. जुलैअखेर निश्चित केलेल्या मुदतीत केवळ ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांचीच नोंदणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या रोडावल्याने शासनाने १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीनंतर नोंदणीच्या स्थितीत मोठी सुधारणा झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना पीकपुरवठा करणाऱ्या बँकांना आपल्या सोयीनुसार संबंधित विमा कंपन्यांकडे विमा हप्ता भरून नोंदणी प्रक्रिया ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गतवर्षी जुलैअखेर सुमारे ३१ लाख शेतकऱ्यांनी बँका कर्ज घेतले होते, त्यापैकी केवळ ऊस पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या १६ लाखांच्या घरात आहे. ऊस पिकाला पीकविमा योजना लागू नसली, तरी उर्वरित पात्र कर्जदार शेतकऱ्यांची संख्या मिळून हा आकडा १० लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या यंदाच्या हंगामात सर्वाधिक पीकविमा नोंदणी झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेड प्रथम क्रमांकावर असून तेथे ९ लाख ४८ हजार ७३६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्याखोोलोल बीड जिल्ह्यात ९ लाख ३४ हजार ८०२, लातूरमध्ये ६ लाख २१ हजार ७७६, परभणीत ५ लाख २३ हजार ३९२ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ५ लाख २३२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. या विपरीत, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पीकविमा नोंदणीला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला असून येथे केवळ १० हजार ४२६ शेतकऱ्यांचीच नोंदणी झाली आहे. रत्नागिरीसह कोल्हापूरमध्ये ११ हजार १८२, रायगडमध्ये १६ हजार ३४, सिंधुदुर्गात २४ हजार २५ आणि गडचिरोली जिल्ह्यात २५ हजार १८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची नोंद समोर आली आहे. राज्यभरात या योजनेअंतर्गत एकूण ३० हजार २८१ कोटी रुपयांची विमा संरक्षित रक्कम जमा झाली आहे.





