पंचायत समिती सदस्य मेघा योगेश इंगावले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
चिपळूण : तालुक्यातील मौजे दळवटणे मोहल्ला येथील कब्रस्तान सुशोभीकरणाच्या कामासाठी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला असून, या विकासकामाचे भूमिपूजन पंचायत समिती सदस्य मेघा योगेश इंगावले यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. दळवटणे मोहल्ला कब्रस्तान सुशोभीकरण करणे, हे काम अल्पसंख्याक योजना अंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. या निधीमुळे कब्रस्तान परिसराचा आवश्यक विकास व सुशोभीकरण होण्यास मदत होणार असून, परिसरातील नागरिकांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
आमदार शेखर निकम यांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघातील विविध समाजघटकांच्या विकासाला समान प्राधान्य दिले आहे. दळवटणे मोहल्ला परिसरातील मुस्लिम समाजाच्या विविध विकासकामांसाठी यापूर्वीही त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कब्रस्तान तसेच रस्त्याच्या विकासासाठी यापूर्वी निधी मंजूर करण्यात आला असून, आता कब्रस्तान सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध झाल्याने परिसराच्या विकासात आणखी एक भर पडली आहे.
भूमिपूजनप्रसंगी पंचायत समिती सदस्य मेघा योगेश इंगावले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक समाजघटकाला न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. विकासकामे करताना कोणताही भेदभाव न करता सर्व समाजांना समान संधी आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. इतर समाजांप्रमाणेच मुस्लिम समाजासाठीही भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दळवटणे मोहल्ल्यातील कब्रस्तान आणि रस्त्याच्या विकासासाठी यापूर्वी निधी देण्यात आला असून, आता कब्रस्तान सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची गरज पूर्ण होत आहे.”
दळवटणे मोहल्ल्यातील विकासकामांसाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले. तसेच विकासकामाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल पंचायत समिती सदस्य मेघा योगेश इंगावले यांचेही नागरिकांनी आभार व्यक्त केले.
चिपळूण मतदारसंघात विविध समाजांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांना चालना देण्याचा प्रयत्न आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून सुरू असून, दळवटणे मोहल्ल्यातील कब्रस्तान सुशोभीकरणाचे काम हे सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य मेघा इंगावले, चिपळूण तालुका नाभिक समाज अध्यक्ष संजय जाधव, गुलामहुसैन चिपळूणकर, अब्दुलमजीद कडवेकर,दिलदार भेलेकर, इरफान भेलेकर, शरीफ कडवेकर, अशरफ कडवेकर , सुरेखा कराडकर, अमान चिपळूणकर, अहमद तळवलकर,प्रदीप निकम , प्रीतम गमरे, अस्मिता घाडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
दळवटणे मोहल्ल्यातील कब्रस्तान सुशोभीकरणासाठी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून निधी मंजूर
Leave a Comment





