रत्नागिरी: रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धामणसे (ता. रत्नागिरी) ग्रामपंचायतीच्या वतीने ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमातून गावातील महिला आणि विद्यार्थिनींनी जवानांसाठी मायेचा धागा पाठवून देशसेवेविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.
धामणसे गावातील संस्कृती ग्रामसंघाअंतर्गत २६ महिला बचत गट तसेच धामणसे प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. जवानांसाठी तब्बल २६० राख्या तयार केल्या. त्यासोबतच विद्यार्थिनींनी जवानांसाठी प्रेम, आदर आणि शुभेच्छा व्यक्त करणारी शुभेच्छापत्रेही तयार केली.
राखी संकलनावेळी २६ बचत गटांच्या अध्यक्ष व सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय जवान, जय किसान’ अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी राष्ट्रप्रेम आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सीमेवर कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांविषयी विद्यार्थिनींच्या मनात आदर आणि कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. जवानांसाठी पाठविण्यात आलेली राखी ही आपुलकी, कृतज्ञता आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक ठरणार आहे.
धामणसेतील गृहलक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूहाने तयार केलेल्या राख्या पोस्ट खात्याच्या माध्यमातून जवानांपर्यंत पाठविण्यात आल्या. धामणसेचे पोस्टमास्तर प्रसाद कुळकर्णी आणि पोस्टमन विराज मेहेत्रे यांच्याकडे या राख्या सुपूर्त करण्यात आल्या.
धामणसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ऋतुजा उमेश कुळकर्णी यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. महिला बचत गट आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत २६० राख्या जवानांसाठी पाठविल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी : धामणसेतील महिलांनी जोडला जवानांच्या मनगटाशी मायेचा धागा
Leave a Comment




