लांजा उड्डाणपुलाच्या भिंतीतून पाण्याची गळती; पुलाच्या  गुणवत्तेवर प्रश्न

Gramin Varta
621 Views

लांजा/अरबाज नेवरेकर : लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या भिंतीतून पावसाचे पाणी झिरपत असल्याचे समोर आले आहे. पुलाच्या भिंतीतील ब्लॉक्सच्या सांध्यातून पाणी थेट खाली कोसळत असल्याने महामार्गावर कृत्रिम धबधब्यासारखे दृश्य निर्माण होत आहे. या प्रकारामुळे उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे लांजा शहरातील काम गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू आहे. मात्र, काम सुरू असतानाच उड्डाणपुलाशी संबंधित विविध समस्या समोर येत आहेत. आता पावसाचे पाणी भिंतीतून झिरपत असल्याने या समस्येत आणखी भर पडली आहे.

न्यू इंग्लिश स्कूल तसेच तहसीलदार कार्यालयाच्या आवारासमोरील उड्डाणपुलावर पावसाचे पाणी साचत असून, त्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. पाण्याला बाहेर जाण्यासाठी योग्य आउटलेट नसल्याने ते पुलाच्या भिंतीच्या आतील भागात शिरत असून, ब्लॉक्सच्या सांध्यातून बाहेर पडत आहे.

भिंतीच्या आत पाणी सातत्याने साचत राहिल्यास आतील माती व खडी वाहून जाण्याची शक्यता आहे. परिणामी भिंतीतील ब्लॉक्स कमकुवत होऊन तडे जाणे किंवा सुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात उड्डाणपुलाच्या संरचनेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसाळ्यातील ही समस्या वेळीच दूर न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे संबंधित यंत्रणेने उड्डाणपुलाची तातडीने पाहणी करून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी. तसेच भिंतीची मजबुती आणि बांधकामाचा दर्जा तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Total Visitors :
4697492
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *