आंबोली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आंबोली वन परिमंडळातील केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अवघ्या २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा माडखोल धवडकी येथील राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आश्लेषा सागर मांगले (मूळ रा. आजरा, जि. कोल्हापूर) असे मृत महिला वनरक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्लेषा मांगले या माडखोल धवडकी येथे पूजा गोवेकर यांच्या घरात भाड्याने राहत होत्या. रविवारी सुट्टी असल्याने त्या दिवसभर घरातच होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घराबाहेर न आल्याने घरमालकांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा उघडून पाहिल्यानंतर आश्लेषा या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलीस महेश जाधव यांनी घटनास्थळी आवश्यक कार्यवाही केली. तसेच वनविभागाच्या देवसू येथील अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
या प्रकरणी घरमालक पूजा गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आश्लेषा मांगले यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
आश्लेषा मांगले या सुमारे तीन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग वनविभागाच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. आंबोली वन परिक्षेत्रातील केसरी वनरक्षक म्हणून त्या जबाबदारी सांभाळत होत्या. अवघ्या २२व्या वर्षी त्यांच्या आयुष्याचा झालेला हा दुर्दैवी अंत वनविभागासह परिसरातील नागरिकांसाठीही धक्कादायक ठरला आहे.
मृत्यूचे नेमके कारण तपासाअंतीच स्पष्ट होणार असून, या घटनेने आंबोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोकण हादरलं! २२ वर्षीय महिला वनरक्षकाने गळफास घेत संपवले जीवन;आंबोली परिसरावर शोककळा
Leave a Comment





