कुंभारखाणी खुर्द ग्रामस्थांचा समाजासमोर नवा आदर्श

Gramin Varta
77 Views

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गावातील खड्डे बुजवत स्वच्छता अभियान; नऊ वाड्यांतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

चिपळूण : स्वातंत्र्यदिन केवळ ध्वजारोहण आणि देशभक्तीपर कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता गावाच्या विकासासाठी प्रत्यक्ष श्रमदान करण्याचा आदर्श संगमेश्वर तालुक्यातील धामापूर-कुंभारखाणी खुर्द येथील ग्रामस्थांनी घालून दिला. १५ ऑगस्ट रोजी कुंभारखाणी खुर्द पंचक्रोशीतील नऊ वाड्यांमधील ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामविकास व स्वच्छता अभियान राबविले. या अभियानात रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्त्यालगतचे गवत व झुडपे हटविणे, विद्युत खांबांवरील वेली व झाडांच्या फांद्या तोडणे तसेच कचरा संकलन करून परिसर स्वच्छ करण्याची कामे करण्यात आली.

‘गाव आपले, जबाबदारीही आपली’ या भावनेतून ग्रामस्थांनी या उपक्रमाला सुरुवात केली. भराडीन देवी व वाघजाई देवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अभियानाला प्रारंभ करण्यात आला. गावणवाडी, भोजनेवाडी, मानेवाडी, गडगेवाडी, हळदवाडी, खडकेवाडी, चाफेवाडी, भेंलेवाडी आणि बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

गावातील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे प्रशासनाची प्रतीक्षा न करता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने खडी-माती टाकून खड्डे बुजविले. यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर, रोलर, गॅस कटर आणि गवत कापण्याच्या मशीनचा वापर करण्यात आला.

गावातील वाढत्या वीजखंडित समस्येच्या पार्श्वभूमीवर विद्युत खांबांवर वाढलेल्या वेली आणि झाडांच्या फांद्याही हटविण्यात आल्या. रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत, झुडपे आणि वाहनांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या हटवून परिसर मोकळा करण्यात आला. अभियानादरम्यान मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करून त्याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावण्यात आली.

गावात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने तसेच रस्त्यांची दुरवस्था असल्यामुळे वयोवृद्ध आणि रुग्णांना उपचारासाठी दूरवर न्यावे लागते. खराब रस्त्यांमुळे खासगी वाहनेही गावात येण्यास टाळाटाळ करतात. या मूलभूत समस्यांवर ग्रामस्थांच्या एकजुटीतून उपाययोजना करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुमित मिरगल यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी हातात हात घालून गावाच्या विकासासाठी काम करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील काळात कुंभारखाणी खुर्द पंचक्रोशीत ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपण अभियानही राबविण्यात येणार आहे.

ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य

या अभियानासाठी गणेश चाचे, मनोज भोजने, श्रीकृष्णा ग्रामस्थ मित्र मंडळ गावणवाडी, नयन भोजने, रवींद्र भोजने, सुभाष भोजने, अजय भालेकर, विजय मोरे, रामदास भोजने, कृष्णा टोपरे, महेश माने, राजेंद्र महाडीक, मेघाताई भोजने आणि गंगाबाई कांबळे यांनी आर्थिक सहकार्य केले.

जेसीबीचा खर्च उद्योजक मनोज भोजने यांनी केला. नरेश भोजने यांनी वृक्षारोपणासाठी रोपे, तर रोहित करंजकर यांनी मेडिकल किट उपलब्ध करून दिले. गवत कापण्याच्या मशीनसाठी रवींद्र महाडीक, दीपक माने, दिनेश माने, रामदास भालेकर, गणेश टोपरे, संतोष गमरे, पांडुरंग भोजने, शंकर वरेकर आणि हर्षद गमरे यांनी सहकार्य केले.

अभियानात सहभागी ग्रामस्थांसाठी नाश्ता, जेवण, चहा व इतर व्यवस्थेची जबाबदारी संतोष भोजने, विजय भोजने, संदेश भालेकर, सचिन भोजने, सचिन सिताराम भोजने, नितीन भोजने, प्रमोद भोजने, वसंत भोजने, दिनेश माने, गणेश टोपरे, रोहित करंजकर आणि प्रमोद माने यांनी सांभाळली. कुंभारखाणी खुर्द बौद्धजन विकास मंडळ, बौद्धवाडी यांच्या वतीने उपस्थितांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.

‘शासन करेल’पेक्षा ‘आपणच करू’चा संदेश

या उपक्रमातून गावाचा विकास केवळ शासनाच्या योजना किंवा ग्रामपंचायतीवर अवलंबून नसून प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी स्वीकारल्यास गावाचा कायापालट शक्य आहे, हा संदेश ग्रामस्थांनी दिला. नऊ वाड्यांतील नागरिकांनी एकत्र येत केलेल्या श्रमदानामुळे गावातील एकजूट, सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्याची भावना अधोरेखित झाली. भविष्यातही स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि मूलभूत सुविधांसाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Total Visitors :
4718641
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *