चिऱ्याच्या ट्रकने तरुणाचा जीव घेतला; आंबवली पेटली! संतप्त ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

Gramin Varta
406 Views

देवरूख : चिऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत आंबवली येथील ३३ वर्षीय तरुण प्रतिक सावंत याचा मृत्यू झाल्याने परिसरातील संतापाचा उद्रेक झाला आहे. अपघातानंतर देवरूख पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करूनही ठोस कारवाईचे आश्वासन न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी थेट संगमेश्वर (देवरूख) तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. ‘आश्वासन नको, थेट कारवाई करा’, अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकच्या चालकावर कारवाई करण्याबरोबरच बेकायदा चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकावरही तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. केवळ चालकावर कारवाई करून हा विषय संपवू नये, तर बेकायदा वाहतुकीला जबाबदार असलेल्या ट्रक मालकालाही कारवाईच्या कक्षेत आणावे, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

दरम्यान, या मार्गावरून सुरू असलेल्या अनियंत्रित आणि ओव्हरलोड चिरे वाहतुकीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार होणाऱ्या धोकादायक वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने कडक निर्बंध घालावेत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलन अधिक तीव्र करत ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यासही ठाम नकार दिल्याची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत ठोस कायदेशीर कारवाई होत नाही आणि प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

शेकडो ग्रामस्थ तहसीलदार कार्यालयात दाखल झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. तहसीलदार तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र, केवळ चर्चेच्या फेऱ्या नकोत, तर प्रत्यक्ष कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. प्रतिक सावंतच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई आणि धोकादायक चिरे वाहतुकीला आळा घालण्याच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, असा स्पष्ट इशारा संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

Total Visitors :
4730082
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *