रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत संविधानावर आधारित लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि नागरिकांचे हक्क या विषयावर जनजागृती निर्माण करण्यासाठी रत्नागिरी शहरात ‘न्यायवेध सभा’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लॉ लॅब इनोव्हेशन्स’ आणि ‘जनहित फाउंडेशन, महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही सभा रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता जे. के. फाईल परिसरातील रॉयल बँक्वेट हॉल येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे प्रख्यात वकील, संविधान विश्लेषक व नागरीहक्क भाष्यकार ॲड. असीम सरोदे उपस्थित राहणार असून, ते “संविधान, न्याय आणि लोकशाहीसाठी संवाद” या विषयावर विचार मांडणार आहेत. सध्या देशात न्यायाची मागणी करणारे कार्यकर्ते, शासकीय कामांचे विश्लेषण करणारे अभ्यासक तसेच प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवणारे सामान्य नागरिक यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. अशा पार्श्वभूमीवर संविधानाचा सन्मान, सर्व जाती-धर्मांतील नागरिकांचे अधिकार आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्ये यांविषयी समाजात सजगता निर्माण व्हावी, या हेतूने या सभेचे आयोजन करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. या सभेचे निमंत्रक तथा जनहित फाउंडेशन, महाराष्ट्रचे संस्थापक श्री. प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी जिल्ह्यातील सर्व अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि सजग नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.




