रत्नागिरी : मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटीवरील ६५ वर्षीय खलाशाचा अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. लक्ष्मण पांडूरंग डावकरे (वय ६५, रा. पूर्णगड, ता. जि. रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण डावकरे हे सडामिऱ्या, रत्नागिरी येथील दिनेश शिवाजी सावंत यांच्या मालकीच्या ‘पुष्पगंधा’ या मच्छिमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करीत होते. १९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजता तांडेल सुशांत सुधाकर महाकाळ यांच्यासह इतर खलाशांसोबत ते मिरकरवाडा बंदरातून मच्छिमारीसाठी समुद्रात गेले होते.
मच्छिमारी सुरू असताना डावकरे यांना अचानक चक्कर आली आणि ते बोटीमध्ये पडले. त्यानंतर त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच बोट तातडीने मिरकरवाडा बंदरात आणण्यात आली. त्यानंतर डावकरे यांना खासगी वाहनाने उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष्मण डावकरे यांना मृत घोषित केले. ही घटना १९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ७.५८ वाजता सिव्हील हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी रात्री १०.५३ वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





