मंडणगड : दहागाव-जाधववाडी येथे घरातील कपाटातून ८.४० लाखांचे मंगळसूत्र चोरीला; कोल्हापुरातील तरुणावर गुन्हा दाखल

Gramin Varta
175 Views

मंडणगड : तालुक्यातील दहागाव-जाधववाडी येथे घरातील बेडरूममधील कपाटाचे लॉक चावीने उघडून तब्बल ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आजरा, जि. कोल्हापूर येथील एका २७ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहागाव-जाधववाडी येथील रविंद्र विष्णू जाधव (वय ४५) यांच्या घरी ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजल्यापासून ७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचे समोर आले. जाधव यांच्या बेडरूममधील कपाटाचे लॉक चावीच्या साहाय्याने उघडण्यात आले. त्यानंतर कपाटातील त्यांच्या पत्नीचे काळ्या मण्यांमध्ये असलेले सोन्याचे मंगळसूत्र लबाडीच्या इराद्याने चोरून नेण्यात आल्याची फिर्याद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

चोरीला गेलेल्या मंगळसूत्राचे वजन सुमारे ६ तोळे म्हणजेच ६० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत ८ लाख ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी फिर्यादी रविंद्र विष्णू जाधव यांच्या तक्रारीवरून २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.१३ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपी पवन संभाजी सुतार (वय २७, रा. चांदेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चोरीच्या घटनेचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4745491
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *