पाली ग्रामीण रुग्णालयात वृद्धेवर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी; एकाच दिवशी सात शस्त्रक्रिया

Gramin Varta
290 Views

पाली : पाली ग्रामीण रुग्णालयात आयोजित शस्त्रक्रिया शिबिरात ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर गर्भाशयाची पिशवी काढण्याची (Hysterectomy) अवघड व महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शस्त्रक्रिया शिबिरात एकाच दिवशी एकूण सात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये सदर वृद्ध महिलेवरील शस्त्रक्रियेसह एका महिलेचे सिझेरियन तसेच कुटुंब कल्याणाच्या लेप्रोस्कोपी शस्त्रक्रियांचाही समावेश होता.

या शस्त्रक्रिया शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. संभाजी गरुड, शल्यचिकित्सक डॉ. मिथिलेश घोसाळकर, भूलतज्ज्ञ डॉ. मंगला चव्हाण आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सचिन साळुंखे यांनी तज्ज्ञ डॉक्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा पाली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.

पाली ग्रामीण रुग्णालयात पाली परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आले आहे. या सुविधेचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यापूर्वी डॉ. भास्कर जगताप आणि डॉ. विकास कुमरे यांनी केले होते. त्यानुसार या शिबिराला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज भासू नये, यासाठी पाली ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आलेल्या या शस्त्रक्रिया सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुमरे यांनी केले आहे. शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी पाली ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

Total Visitors :
4754755
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *