काँक्रिटीकरणाच्या आश्वासनांना खड्ड्यांचे ग्रहण; संगलट बौद्धवाडीचा रस्ता बनला धोकादायक

Gramin Varta
27 Views

शाळेच्या दारातच खड्डे; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

खेड/ संगलट प्रतिनिधी : खेड तालुक्यातील संगलट बौद्धवाडी येथील वडाच्या झाडाजवळ तसेच परिसरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्याला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना अपघाताचा धोका निर्माण झाला असून, संबंधित विभागाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

संगलट बौद्धवाडीमार्गे दापोली, मंडणगड आणि गुहागर या मार्गांना जोडणाऱ्या रस्त्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांनाही या खड्ड्यांचा मोठा फटका बसत असून, पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

विशेषतः बौद्धवाडीतील वडाच्या झाडाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. या साचलेल्या पाण्यात विषारी साप, विंचू यांसारखे जीव लपण्याची शक्यता असल्याने पायी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था ही केवळ वाहतुकीची समस्या न राहता नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीनेही गंभीर बनली आहे.

या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला मंजुरी मिळाल्याचे अनेक वर्षांपासून सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात काम अद्यापही सुरू झालेले नाही. काँक्रिटीकरणाचे आश्वासन कागदावरच राहिले असून, निवडणुकीच्या काळात रस्त्याच्या कामाबाबत दिली जाणारी आश्वासने प्रत्यक्षात कधी उतरतील, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काँक्रिटीकरणाचे काम तातडीने करणे शक्य नसेल, तर किमान रस्त्यावरील जीवघेणे खड्डे आणि पाण्याची समस्या तरी तातडीने दूर करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची तांत्रिक तपासणी करावी. यापूर्वी झालेल्या कामाची गुणवत्ता तपासून आवश्यक ती कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. केवळ तात्पुरती डागडुजी करून प्रश्न मार्गी लावण्याऐवजी रस्त्याची सखोल पाहणी करून दर्जेदार काम करण्याची गरज आहे.

रस्त्याची अशीच दुरवस्था कायम राहिल्यास भविष्यात अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने कधी लक्ष देणार, याकडे संगलट बौद्धवाडीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शाळेच्या दारातच खड्डे; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

संगलट बौद्धवाडी शाळेजवळही रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब झाली असून, शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे लहान विद्यार्थ्यांना शाळेत जाताना हे खड्डे तुडवत मार्गक्रमण करावे लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने विद्यार्थ्यांना नेमकी खड्ड्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने या ठिकाणी दुरुस्ती करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून होत आहे.

Total Visitors :
4756343
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *