रत्नागिरी: रत्नागिरी जवळ असलेल्या मजगाव येथे वीज पुरवठ्याबाबतच्या विविध समस्यांबाबत ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांशी थेट संवाद साधला. यावेळी अभियंत्यांनी सर्व समस्या तातडीने सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. या चर्चेमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं असून, भविष्यातही असंच सहकार्य मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मजगाव ग्रामपंचायतीमध्ये महावितरणचे अभियंता नागवेकर यांनी स्वतः उपस्थित राहून ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यामध्ये वीज बिलांसंदर्भातील अडचणी, जुने झालेले वीज खांब बदलणे, नवीन डीपी (ट्रान्सफॉर्मर) बसवणे यांसारख्या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. अभियंता नागवेकर यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केलं की, या सर्व समस्यांचे निराकरण लवकरच केले जाईल.
यावेळी मजगावचे सरपंच फैयाज मुकादम, उपसरपंच शरीफ इब्जी, हुसेन टेमकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या विचारविनिमयाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत, यापुढील काळातही वीजपुरवठा अधिक सुरळीत होईल अशी आशा व्यक्त केली.