उद्योजकांशी साधणार संवाद; औद्योगिक प्रश्नांवर जाणून घेणार अडचणी
खेड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवा सेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे हे बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीला भेट देणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता ते लोटे औद्योगिक वसाहतीची प्रत्यक्ष पाहणी करून येथील औद्योगिक परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
पाहणीनंतर लोटे येथील उद्योग भवनमध्ये आदित्य ठाकरे हे स्थानिक उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी औद्योगिक क्षेत्रासमोरील विविध अडचणी, प्रलंबित प्रश्न तसेच उद्योजकांच्या मागण्या जाणून घेण्यात येणार आहेत. लोटे औद्योगिक वसाहतीच्या विकासाशी संबंधित विषयांवरही या संवादादरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे.
उद्योजकांशी संवाद साधल्यानंतर उद्योग भवन, लोटे येथे आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत ते लोटे औद्योगिक वसाहतीसह रत्नागिरी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय तसेच औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या लोटे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी पत्रकार बांधवांना पाहणी दौरा आणि पत्रकार परिषदेस उपस्थित राहण्याचे सस्नेह निमंत्रण दिले आहे.




