चाय घ्या चाय! गुहागर अंजनवेल रस्त्यावरील खड्ड्यातील चाय;जनता त्रस्त, अधिकारी सुस्त

Gramin Varta
97 Views

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल मार्गावरील रानवी परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. विशेष म्हणजे या भागातच मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचे ढीग साचल्याने वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, वाहनचालकांना खड्डे चुकवत अक्षरशः कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वारांसाठी तर हा मार्ग म्हणजे अपघाताला थेट आमंत्रणच ठरत आहे. आतापर्यंत या ठिकाणी दुचाकीस्वारांचे अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. सुदैवाने अद्याप मोठी दुर्घटना घडलेली नाही; मात्र प्रशासनाने याचा अर्थ परिस्थिती सुरक्षित आहे, असा घेऊ नये.

रस्त्यावर मातीचे ढीग पडून राहिल्याने पायी चालणाऱ्या स्थानिक नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे. वाहनांची वर्दळ, खड्डे आणि माती यामुळे या मार्गावरून ये-जा करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ ठरत आहे.

प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार? एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे केवळ खड्डे बुजवून या समस्येवर तात्पुरता मलमपट्टीचा उपाय करणे म्हणजे पुन्हा काही दिवसांनी त्याच समस्येला निमंत्रण देण्यासारखे आहे. पावसाळ्यात खड्डे बुजवले आणि काही दिवसांतच रस्ता पुन्हा उखडला, तर या कामाचा उपयोग काय? त्यामुळे खड्डे बुजवण्याच्या नावाखाली थातूरमातूर काम न करता अंजनवेल-रानवी मार्गाचा या भागात पूर्णपणे नव्याने दर्जेदार रस्ता तयार करणे गरजेचे आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आता केवळ पाहणी, आश्वासने आणि तात्पुरत्या डागडुजीपुरते मर्यादित न राहता ठोस निर्णय घ्यावा. रस्ता दुरुस्त करण्यासाठी अपघात होण्याची किंवा एखादा जीव जाण्याची वाट पाहू नका, अशी संतप्त मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

अंजनवेल-रानवी मार्गाची ही अवस्था प्रशासनाच्या निष्क्रियतेचे उदाहरण ठरू नये. नागरिकांना सुरक्षित रस्ता देणे ही कोणाची कृपा नसून प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून तात्पुरती खड्डे बुजवण्याची मलमपट्टी न करता कायमस्वरूपी आणि दर्जेदार रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Total Visitors :
4764329
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *