खेड रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; पार्किंगमधील वाहनांमधील ऐवज लंपास

Gramin Varta
129 Views

खेड : खेड शहर आणि परिसरात सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. थेट खेड पोलीस ठाण्यासमोरील दुकानात झालेली धाडसी चोरीची घटना ताजी असतानाच, आता वर्दळीच्या खेड रेल्वे स्थानकासमोरील एका निवासी इमारतीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी वाहनांमधील महागड्या वस्तू आणि साहित्यावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पहाटेच्या सुमारास घडलेली ही संपूर्ण चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून चोरट्यांच्या हालचाली उघड झाल्या आहेत. खेड रेल्वे स्थानक परिसर हा चोवीस तास प्रवासी आणि वाहनांच्या गजबजाटाचा भाग असतानाही, मध्यरात्री तसेच पहाटेच्या वेळी पोलिसांची पुरेशी गस्त नसल्यामुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढत असल्याचा थेट आरोप स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे. या परिसरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडलेल्या असताना सुरक्षा यंत्रणेकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त तात्काळ वाढवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी जोरदार मागणी आता खेडकरांमधून केली जात आहे.

Total Visitors :
4761326
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *